ठाणे (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ठाणे शहर जिल्हा भाजपच्यावतीने शहराच्या विविध भागात भारतीय नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय लोकसंख्या पुस्तिका (एनपीआर) बाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर विविध ठिकाणी भारतमातेचे उत्साहात पुजन करण्यात आले. आमदार व भाजपचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनजागृतीच्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील रेल्वे स्टेशन, नौपाडा, राम मारुती रोड, उथळसर, वागळे इस्टेट, कळवा, घोडबंदर रोड आदी भागांमध्ये उत्साहात भारतमातेचे पूजन करण्यात आले. तसेच सीएए व एनपीआर बाबत माहिती देण्यात आली. नौपाड्यात झालेल्या कार्यक्रमाला आमदार डावखरेबरोबच ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मढवी, राजेश मढवी आदी उपस्थित होते. __ आमदार संजय केळकर, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, संदीप लेले, मुकेश मोकाशी, डॉ. राजेश मढवी, नगरसेविका प्रतिभा मढवी, भाजयुमोचे ठाणे - पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रमेश सागळे यांनीही भारतपूजनाच्या कार्यक्रमात भाग घेऊन ठिकठिकाणी सीएए, एनपीआरबाबत जनजागृती केली. ठाणे रेल्वे स्टेशनवरील रिक्षा स्टॅण्डजवळ झालेल्या कार्यक्रमाला रिक्षाचालकांबरोबरच मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. सीएए, एनपीआरमुळे भारतातील नागरिकांना काहीही त्रास होणार नाही. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांकडून अपप्रचार करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात हा मुद्दा वापरला जात आहे, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. काँग्रेसच्या काळात एनपीआरची सुरुवात करण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी सीएए व एनपीआरबाबत सविस्तर माहिती दिली.