कोरोना च्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी (ता.15) रात्री 8:30 वाजता बल्लाळेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. मंदिर निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या कालावधी पर्यंत बंद राहणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.14) रायगड जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र पाली, तालुका सुधागड बल्लाळेश्वर मंदिर, खालापूर तालुक्यातील महड वरदविनायक मंदिर, उरण तालुक्यातील घारापुरी लेणी तसेच खालापूर तालुक्यातील इमॅजिका वॉटर पार्क 31 मार्च पर्यंत नागरिकांना प्रवेशासाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे पालन पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टने ताबडतोब केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रविवारी (ता.15) रात्री पुढील सूचना मिळेपर्यंत बल्लाळेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. अशी माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धंनजय धारप यांनी दिली. प्रशासनाने काढलेले आदेश सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी मंदिर ट्रस्टला दिल्यावर ताबडतोब ट्रस्टने खबरदारी घेऊन मंदिर बंद करण्याचा निर्णय घेऊन सहकार्य केले.
पहिल्यांदाच देऊळ बंद पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.