ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सापडले लाखोंचे धनादेश.

 


मनपा कार्यशाळेच्या निविदेसाठी अनामत रक्कमेचे धनादेश  


ठाणे,ता.18 प्रतिनिधी   
  ठाणे महानगरपालिकेच्या मागील प्रवेशद्वारावर तब्बल 32 लाख 80 हजाराचे डेप्युटी सिटी इंजिनियरच्या नावे असलेले चार धनादेश/धनाकर्ष खाकी लखोट्यात बेवारस पडलेले आढळल्याने खळबळ उडाली.सोमवारी दुपारी महापालिकेत कामानिमित्त आलेले काँग्रेस पदाधिकारी राहुल पिंगळे यांच्या दृष्टीस हे धनादेश पडल्याने त्यांनी तातडीने हे धनादेश मुख्य सुरक्षा अधिकारी मछिंद्र थोरवे यांच्यासमक्ष महापौर नरेश म्हस्के यांच्या स्वाधिन केले.दरम्यान,हे धनादेश ठामपा कार्यशाळा विभागाचे असून निविदा प्रक्रियेसाठी आणले होते.मात्र,घाईगडबडीत धनादेशांचा लखोटा गहाळ झाला.सद्यस्थितीत हे धनादेश संबंधित विभागाकडे जमा करण्यात आले आहेत.    


  सोमवारी दुपारी पिंगळे हे कामानिमित्त महापालिका मुख्यालयात आले होते.पालिकेच्या प्रवेशद्वार नं.4 मधून पालिकेत शिरून दुचाकी पार्किंग करताना पिंगळे याना एक बेवारस खाकी लखोटा जमिनीवर पडलेला दिसला.त्यांनी हा लखोटा उघडून पाहिला असता त्यात चार धनादेश असलयाचे दिसले.प्रत्येकी 8 लाख रक्कमेचे असे तब्बल 32 लाख 80 हजार 450 रुपयांचे हे चार धनादेश असल्याचे समोर आल्याने जबाबदारीने पिंगळे यांनी ते धनादेश मुख्य सुरक्षा रक्षक मच्छिन्द्र थोरवे यांच्या समक्ष महापौर नरेश म्हस्के व उपमहापौर पल्लवी कदम यांच्या स्वाधीन केले.या चारही धनादेशावर डेप्युटी सिटी इंजिनिअर,ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असे लिहलेले होते.त्यामुळे एवढ्या मोठ्या रक्कमेचे धनादेश डेप्युटी सिटी इंजिनियर याना कुणी दिले ? ठाणे महापालिका डिजिटल झाली असताना अशाप्रकारे धनादेशाद्वारे आर्थिक व्यवहार  कसे केले ? सदर धनादेश गहाळ झाले कि,कुणी जाणूनबुजून फेकले ? असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले होते.अखेर,सुरक्षा अधिकाऱ्यांनी या धनादेशाबाबत चौकशी केली असता ठाणे महापालिकेच्या कार्यशाळेशी संबंधीत हे धनादेश असल्याचे समोर आले.त्यानुसार,चारही धनादेश संबंधित विभागाचे अधिकारी झांबरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.