ठाणे(विशेष प्रतिनिधी) - ठाणे पोलीस आयुक्लयांतर्गत ठाणे, कल्याण डोंबिवली व उल्हासनगर महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्ररूप घेत असून त्याची व्याप्ती आता थेट ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बारपर्यंत पोहोचली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड, वागळे इस्टेट आणि कल्याण डोंबिवली शहर व लगतच्या ग्रामीण परिसरात सुमारे २०० च्या आसपास ऑर्केस्ट्रा व लेडीज सर्व्हिस बार आहेत. बऱ्याच बार मालकांनी पालिकेची परवानगी न घेता अंतर्गत बेकायेशीरपणे बांधकाम करून चोरकप्पे बनविले असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तसेच या बारवाल्यांवर पोलिसांची कारवाई होत असतानाही केवळ वरिष्ठांच्या वॉचमुळे थातूरमातूर कारवाई करून पुन्हा जैसे थे स्थिती असते. वर्षभरापूर्वी उपवन येथील एका मोठया बार व लॉजवर ठामपाने कारवाई करून जमीनदोस्त केले होते. मात्र सध्या शहरातील लेडीज बार, ऑर्केस्ट्रा बार आणि लॉजेस बिनदिक्कतपणे सुरू असल्याने नागरिकांनी असुरक्षिततेची भावना व्यक्त केली आहे.
ठाणे शहर, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिकांच्या हद्दीत असलेल्या बारवर पोलिसांकडून मारल्या जाणाऱ्या छाप्याच्या वेळी बारबालांना लपविण्यासाठी बारमध्ये छुपी खोली बनविली असल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले होते. यामुळे ठाण्याच्या अप्पर पोलीस आयुक्तांनी अशा लेडीज बारची पाहणी करून कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्रे पाठविली होती. त्यासंबंधी एक पथक गठीत केले होते. या पथकाने पालिका हद्दीतील २८ ऑर्केस्ट्रा बार व लेडीज सर्व्हिस बारची प्रत्यक्षात पाहणी केली केल्याचे अहवालात नमूद केले. त्यामध्ये काही बारमध्ये स्टोअर रूम, गोडाऊन, महिलांचे मेकअप रूम, विश्रांतीची खोली असल्याचे आढळून आले असल्याचे पोलिसांना सादर केलेल्या आहवाल नमूद केले आहे. आजही डान्स बारमध्ये ऑर्केस्ट्राचा धुमधडाका जोरात सुरू असताना, बारबालांना लपविणारे चोरकप्पे शोधणारे पथक शांत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील काही पोलिसांचा वरदहस्त असल्याने ठाणे पोलीस आयुक्तातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स व बारवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात येतात. मात्र हॉटेल्स व बारवाल्यांशी लागेबांधे असतील अथवा त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तींवरही वॉच ठेवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे समजते.