ठाणे : ४५ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रत्येक विद्यार्थी एक नवा अनुभव घेऊनच पुढे जाणार आहे. तो उद्याचा वैज्ञानिक, संशोधक असेल, या प्रदर्शनातील त्याचा अनुभव त्याला निश्चितच समृद्ध करेल असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सिम्बोयसिस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कौसा,शिळ येथे २९ जानेवारी ते ३१ जानेवारी कालावधीत संपन्न झाले. शुक्रवारी प्रदर्शनाच्या समारोपा प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यापीठावर शिक्षणाधिकारी शेषराव बडे, संस्था संचालक कमलराज देव, प्राचार्य स्नेहलता देव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दूरध्वनीवरून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून ऐकवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शनातील वस्तूंचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघावीत आणि शिक्षक पालकांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखवावी असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. __ यंदाच्या वर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता असा विषय देण्यात आला होता . या प्रदर्शनात सर्व व्यवस्थापनाच्या शाळा तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सहावी ते बारावीच्या विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. विदार्थ्यांनी तब्बल ६० प्रकल्प यावेळी सादर केले. त्याच बरोबर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांसाठी तसेच प्रयोग शाळा सहायक यांची देखिल नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा घेण्यात आली आहे. यामध्ये ३० प्रकल्प सादर करण्यात आले. या स्पर्धेतून प्राथमिक स्तरावर प्रथम क्रमांक - चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली, द्वितीय क्रमांक आदर्श विद्यामंदिर,कासारवडवली ठाणे, तृतीय क्रमांक संत तुळशीराम हिंदी शाळा डोंबिवली, तसेच शहापूरच्या आदिवासी भागातील प्रगती विद्यालय ठिले , शहापूर, यांना देखील गौरवण्यात आले. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक हलारी विसा ओसवाल, भिवंडी, द्वितीय क्रमांक डॉ,. बेडेकर विद्यामंदिर ठाणे, तृतीय क्रमांक, डॉ.सामंत विद्यालय, तुर्भे, तर आदिवासी विभागातील माध्यमिक विद्यालय आसनगाव गौरवण्यात आले. तसेच प्राथमिक शिक्षक गटातून जिल्हा परिषद शाळा कळमपाडा, ता.शहापूर, माध्यमिक शिक्षक गटातून शुक्ला एज्युकेशन सोसायटी तर प्रयोगशाळा सहाय्यक गटातून सावित्रीदेवी थिराणी विद्यालय, वर्तकनगर, ठाणे यांना गौरविण्यात आले. हे प्रकल्प राज्यस्तरावर जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या निरोप सत्रासाठी दिलीप पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस. पाटील, विज्ञान पर्यवेक्षक सुरेश देशमुख, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते _
विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी उद्याचा वैज्ञानिक-संशोधक असेल - जि.प. अध्यक्ष दिपाली पाटील