संपादकीय पदपथ कायमचे मोकळे करा!

 ठाण्याचे नवनियुक्त महापौर नरेश म्हस्के यांनी खुर्चीवर बसताच प्रशासनाला जोरदार कामाला लावले आहे. पाणीपुरवठा, मलः निस्सारण, रस्ते विकास, झोपडपट्टी पुनःविकास आणि स्मार्ट ठाण्यासाठी महापौरांनी कंबर कसली आहे. त्यांचे हे कार्य ठाणेकरांच्या कौतूकास पात्र ठरत आहे. नुकतेच त्यांनी वागळे इस्टेट परिसरातील पदपथ मोकळे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले तर सदर परिसरातील व्यापारी गाळे, टपरीधारक यांनाही पदपथ मोकळे करून नागरिकांना रहदारीस वाट सुकर करण्याचे आवाहन केले आहे. खरंतर दरवेळेला नवीन महापौर खुर्चीत बसले की कामाचा धडाका सुरू करतात. मात्र वर्षभरानंतर त्याकडे दुर्लक्ष होवून गाळेधारक, टपरीचालक, फेरीवाले आपले बस्तान या पदपथांवर मांडतात. हा प्रकार आता कायमचा बंद होणे आवश्यक आहे. ठामपा प्रशासनाने ठरवून दिलेले फेरीवाला धोरण प्रत्यक्षात अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना उद्योगासाठी व्यवस्था करून दिल्यास याला काही अंशी आळा बसू शकेल. ठाणे स्टेशन, गोखले रोड, शिवाजी पथ, एल बी एस मार्ग, एम. जी. रोड, सावरकर रोड असे मुख्य रस्ते रस्त्या बेकायदा फेरीवाले, गॅरेजेस, दुचाकी शोरुम अशा विविध उद्योग व्यवसायाधारकांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर वाहतूक कोंडीत वाट काढावी लागतेय. विशेष म्हणजे ज्या परिसरात शाळा, रुग्णालये आहेत. अशा ठिकाणचे पदपथ मोकळे होणे आवश्यक आहे. मावळी मंडळ शाळेकडे जाताना एदलजी रोडवरील पदपथ तर नेहमीच चालण्यास अडचणीचे ठरत असतात. शंकरराव पवार कंपाउंडचा अख्ख पदपथ दुचाकीवाल्यांनी व्यापून टाकलाय. एलबीएस मार्गावर वंदना सिनेमाकडून मिनाताई ठाकरे चौकाकडे जाताना पादचाऱ्यांना पदपथ शोधावा लागतोय. या मार्गावर उड्डाणपूल उभारण्यापूर्वी रस्त्याच्या डावीकडील बाजूस ठामपाने मार्कीग करून दिलेले रस्तारुंदीकरण होणार होते. मात्र व्यापाऱ्यांनी प्रशासनाशी संधान साधून हे रस्तारुंदीकरण कायमचे रद्द केल्याचे दिसत आहे. उड्डाणपूल बांधल्यानंतरही या मार्गावरील वाहतूक कोंडी ही कमी होण्याचे नाव घेत नाही. महापौर म्हस्केंनी पदपथ मोकळे करण्याची सुरू केलेली मोहिम ठाणे शहराकडे कधी वळणार असा सवाल ठाणेकर व्यक्त करीत आहेत. महापौरांना ठाणे शहराची पूर्ण जाण आहे. स्वच्छ, सुंदर स्मार्ट सिटी ठेवण्यासाठी ठाणेकरांचे सहकार्य हवे असेल तर प्रथम पदपथ कायमचे मोकळे करण्यात यावेत तरच स्मार्ट ठाण्याचे स्वप्न सत्यात उतरेल ही अपेक्षा!