आज ठामपात 'महापौर जनसंवाद'

ठाणे - गेल्या महिन्यात महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षेखाली घेण्यात आलेल्या महापौर जनसंवाद या उपक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच या जनसंवादात नागरिकांनी उपस्थीत केलेल्या समस्यांचा लागलीच निपटारा झाल्याने अनेकांनी समाधान व्यकत करुन हा कार्यक्रम या पुढेही अविरतपणे सुरू ठेवावा अशा मौलिक सूचना केल्या. या उपक्रमाअंतर्गत फेब्रुवारी २०२० मधील महापौर जनसंवाद येत्या सोमवारी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित केला असल्याची माहिती महापौरांनी दिली. जानेवारी महिन्यात संपन्न झालेल्या महापौर जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांना उत्स्फूर्तपणे आपल्या समस्या थेट महापौर व प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये बहुतांशी प्रश्नांचा कार्यक्रमातच निपटारा करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. येत्या सोमवारी आयोजित केलेल्या महापौर जनसंवादात नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी सहभागी व्हावे. सकाळी १०.३० वा. महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आपली समस्या लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर करावी. नागरिकांना समस्या मांडण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या मुक्त व्यासपीठाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. नागरिकांना थेट महापौर व प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटून नागरी कामांच्या समस्या मांडता याव्यात व त्याचे निराकरण तातडीने करुन सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचा निपटारा तत्परतेने व्हावा किंवा त्यांना न्यायहक्क मिळावा यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या अभिनव संकल्पनेतून प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी 'महापौर जनसंवाद' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये महापालिकेचे पदाधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थीत राहून नागरिकांच्या नागरी कामांविषयी असलेल्या तक्रारी ऐकतील व त्यावर निर्णय घेवून ते प्रश्न मार्गी लावतील ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल व त्यांना या माध्यमातून खुले व्यासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.