सराईत गुन्हेगारांकडून ६ गावठी पिस्टल व १२ काडतुसे जप्त.

 


 


पुणे – पोलीस अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करीत त्यांच्याकडून ६ गावठी पिस्टल व १२ काडतुसे जप्त करण्यात आली. युनिट चारच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. 


रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय ३३, रा सोमवार पेठ, पुणे), चंद्रशेखर रामदास वाघेल (वय ३०, राहता मुकुंदनगर पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, युनिट चारचे पोलीस हवालदार सुनील पवार यांना समर्थ व्यायाम शाळेजवळ रास्ता पेठ पुणे येथे अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगार पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या आदेशानुसार, युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी रोहन व चंद्रशेखर यांना ताब्यात घेतले. त्यांची तेथेच अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ६ गावठी पिस्टल व १२ काडतुसे जप्त करण्यात आली.


आरोपी रोहनवर, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, घातक शस्त्रे विक्री यांसारखे एकूण २३ गुन्हे नोंद आहेत. तर आरोपी चंद्रशेखर यावर येरवडा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे. युनिट चारचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.