सासूला गोळ्या घालून मारले आणि जेसीबी ऑपरेटरची नोकरी करू लागला...'त्या' खून प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर .

 


 


नगर - पारनेर सासूला गोळया घालून ठार मारणाऱ्या जावयास पारनेर पोलिस ठाण्याच्या पथकाने अखेर सव्वा महिन्यानंतर शुक्रवारी दुपारी किरवली वरले (ता. वाडा, जि. पालघर) येथे अटक केली आहे.


पत्नीस नांदण्यास न पाठवता खोटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल केल्याच्या रागातून सासू सविता हिचा गोळ्या घालून खून केल्याची कबुली आरोपी राहुल गोरख साबळे (रा. रांधे, ता. पारनेर) याने दिली आहे.


पारनेरच्या न्यायालयाने त्यास ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. १७ फेेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास राहुल याने सासू सविता सुनील गायकवाड (वय ३५, वडझिरे) यांच्या घरी जाऊन गावठी कट्टयातून गोळया घालून हत्या केली होती.


हत्या केल्यानंतर राहुल याने दुचाकीवरून रांजणगाव (जि. पुणे) गाठले. तेथील आपल्या खोलीतून कपड्यांची बॅग घेऊन तो चाकणपर्यंत दुचाकीवर गेला. दुचाकी तेथेच सोडून तो मुंबईत पोहोचला. आठ दिवस लोकल ट्रेनने मुंंबईत फिरल्यानंतर तो किरवली (वारले, ता. वाडा, जि. पालघर) येथे पोहोचला.


तेथे जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करण्यास त्याने सुरूवातही केली होती.खुनाची घटना घडून महिना उलटला तरी आरोपीचा शोध न लागल्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.


एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पोलिस यंत्रणा गुंतलेली असताना तपासी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे आरोपी राहुलच्या हालचालींवरही लक्ष होते.


तो वाडा तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रमोद वाघ, पो. कॉ. भालचंद्र दिवटे, पो. कॉ. सत्यजित शिंदे यांनी किरवली येथे जात सापळा रचून राहुल यास ताब्यात घेतले.